संपूर्ण आदिवासी लोकवस्ती असलेले मेंढा (लेखा) हे काही एकच गाव नाही. मग त्या सर्व गावांमध्ये असे का घडत नाही? याचा अर्थ स्पष्ट आहे की, ही सर्वांमध्ये असलेली मानवी क्षमताच आहे, जी कुठेही प्रगट होऊ शकते!

जशी देशात लोकसभा, राज्यात विधानसभा तशीच गावात ग्रामसभा व शहरातील मोहल्ल्यात मोहल्लासभा आहे. या ग्रामसभा व मोहल्लासभा स्वयंभू आहेत. त्यांना कुणी निवडून दिलेले नाही, म्हणूनच त्यांना कुणी पाडूसुद्धा शकत नाही. अशी ग्रामसभा व मोहल्लासभा हेच राजकीय व सामाजिक सांगाड्याचे पायाभूत घटक (बेसिक युनिट) आहेत. अशी जिवंत ग्रामसभा किंवा मोहल्लासभा एखादे लहान राजस्व गाव, टोला, पाडा, मोहल्ला किंवा हाऊसिंग सोसायटीसुद्धा असू शकेल.......